Friday, 12 June 2020

चिकन दम बिरयाणी

चिकन दम बिरयाणी

साहित्य: अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बिरयाणी तांदूळ, दही, लाल मिरची पावडर, धना पावडर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चक्रीफूल, १ जावेत्री, ४-५ हिरवी वेलची, १ मोठी वेलची , शहाजिरे, जिरे, जायफळ, लवंग, काळे मिरे, तमालपत्र, दालचिनी, कोथिंबीर, पुदिना, लाल फूड कलर, १ लिंबू, ५-६ कांदे, तूप इत्यादी  .

कृती :  १. बिरयाणी मसाला

१ चक्रीफूल, १ जावेत्री, ४-५ हिरवी वेलची, १ मोठी वेलची ,१ छोटा चमचा शहाजिरे, एक छोटा चमचा जिरे, पाव भाग जायफळ, २-३लवंग, ४-५काळे मिरे इत्यादी मिक्सर च्या भांड्यामधे घालून बारीक पावडर बनवून घ्या.

टीप : ही कृती अर्धा किलो बिर्याणीसाठी आहे त्यासाठी एवढे प्रमाणात गरम मसाल्याचे पदार्थ वापरा.

२. चिकन मॅरिनेशन

अर्धा किलो चिकन धुऊन घ्या. त्यावर १ लिंबू पिळा व चवीनुसार मीठ टाका , १ चमचा लाल मिरची पावडर , १चमचा धना पावडर , १ छोटी वाटी दही, ४-५ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ चमचा वर सांगितल्याप्रमाणे बिर्याणी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना इत्यादी टाकून मिश्रण हलवून घ्या. सर्व वस्तू एकमेकांत मिसळलेल्या आहेत का बघा आणि अर्ध्या तासा साठी तसेच झाकून ठेवा.

टीप : या मध्ये तुम्ही  रोज वॉटर किंवा केवडा वॉटर घालू शकता त्यामुळे बिर्याणीला छान वास येतो.

३. तांदूळ शिजवणे

अर्धा किलो बिर्याणीसाठीचा लांब दाणे असलेला तांदूळ धुऊन स्वच्छ करा व अर्ध्या तासा  साठी भिजवून ठेवा. नंतर तांदळाच्या चारपट पाणी एका भांड्यात घ्या त्यामध्ये १चमचा तेल, चवीनुसार मीठ, १ इंच दालचिनी , २ तमालपत्र व १ छोटा चमचा शहाजिरे टाका. पाण्याला उखळी आली की भिजलेले तांदूळ पाण्यात टाका. अधून मधून तांदूळ हलवून घ्या. तांदूळ ७५% शिजवा . म्हणजे जेंव्हा तांदळा मध्ये १ कणी राहील तेंव्हा गॅस बंद करा आणि तांदळा मधील पाणी गाळून वेगळे करा.

टीप : तांदूळ पूर्ण शिजवून घेऊ नका नाहीतर बिर्याणी चिखल सारखी होईल. तांदूळ जास्त कच्च ठेऊ नका नाहीतर पुन्हा शिजवता येत नाही. त्यामुळे तांदूळ बरोबर १ कणी राहिल असाच शिजवून घ्या.

४. चिकन शिजवणे

एका कुकर मध्ये थोडे तेल घालून ५-६ मध्यम आकाराचे कांदे पातळ उभ्या आकारात चिरून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या व मॅरीनेट झालेले चिकन  त्यामध्ये परतून घ्या व १ वाटी पाणी टाकून १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. जर जास्त पाणी राहिले तर गॅस मोठा ठेऊन पाणी आटून घ्या व ग्रेव्ही प्रमाणे घट्टसर होईल अश्या पद्धतीत करून घ्या.

५. बिर्याणी

एक  जाड तवा गॅस वर मंद आचेवर ठेवा. त्यावर एक टोप ठेवा. टोपा मध्ये थोडे तेल टाका वर भाताचा एक लेअर पसरवा. भातावर फूड कलर टाकून थोडे हलक्या हाताने हलवा त्यावर शिजवलेल्या चिकन चा लेअर द्या पुन्हा भाताचा लेअर देऊन नंतर राहिलेले सर्व चिकन चा लेअर द्या व सर्वात शेवटी बिर्याणी मसाला अर्धा चमचा तूपा  मध्ये मिक्स करून त्यावर टाका. व झाकण ठेऊन त्यावर जाड वस्तू ठेवा ज्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही व बिर्याणीला दम येईल. ५-१० मिनिटांनी गॅस बंद करा व हलक्या हाताने बिर्याणी खाली वर हलवा.

टीप : बिर्याणी जास्त जोराने हलवली असता तांदूळ मोडू शकतो त्यामुळे हलक्या हातानेच हलवा.





चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो.


धन्यवाद !!




बटर चिकन

बटर चिकन

साहित्य : अर्धा किलो चिकन चे मऊ तुकडे, लाल मिरची पावडर, धना  पावडर , मीठ, बेसन पीठ, दही, कांदा , टोमटो, काजू, आलं-लसूण पेस्ट, सुखी मिरची, खोबरे, बटर/तूप , टोमॅटो सॉस इत्यादी

कृती:  १. चिकन शिजवणे

प्रिपरेशन : लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट करा. १ मध्यम आकाराचा कांदा बारीक़ चिरून घ्या. साधारण १ वाटी पाणी गरम करा.

प्रथम चिकन चे मऊ तुकडे धुऊन घ्या, त्या नंतर कुकर मध्ये १ चमचा तेल घाला व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजल्या नंतर त्यामध्ये लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर थोडी हळद घाला व चिकन चे तुकडे घालून छान परतून घ्या. ३-४ मिनिटे परतून घेतल्या नंतर त्यामध्ये साधारण १ वाटी गरम पाणी घाला आणि कुकर बंद करा. गॅस मंद आचेवर ठेऊन १० मिनिटे चिकन शिजवा . चिकन शिजल्या नंतर त्यामधील पाणी ज्याला आपण आळणी किंवा सूप म्हणतो ते वेगळे करा आणि शिजलेले चिकन चे तुकडे एका ताटामध्ये काढून घ्या .

 टीप : चिकन कमी शिजले तरी चालेल आपण पुन्हा चिकन ला फ्राय करणार आहोत तेंव्हा चिकन शिजते .
चिकन जास्त शिजवू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतील आणि पुन्हा फ्राय करता येणार नाही. चिकन शिजवणे हि स्टेप तुम्ही केली नाही तरी चालेल.

२. चिकन मॅरिनेशन

आता शिजलेले तुकडे थोडे थंड झाले म्हणजे त्यावर अर्धे लिंबू पिळा. नंतर त्यावर २ चमचे दही, १ छोटा चमचा धना पावडर , चवीनुसार मीठ , १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर व १ छोटा चमचा फ्राय केलेले बेसन घाला सर्व तुकड्यांना मिश्रण लागेल या पद्धतीने हलवा व ते ताट फ्रिज मध्ये अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवा.

टीप : चिकन शिजवताना मीठ टाकले नाही त्यामुळे चिकन मॅरिनेट करताना त्या अंदाजाने मीठ वापरा. या मध्ये तुम्ही जिरा पावडर आणि हळद हि टाकू शकता. मी हे दोन पदार्थ टाकले नाहीत . हे ऑपशनल आहेत.

३. बटर चिकन ग्रेव्ही

 एका कढई मध्ये १ चमचा तेल घालून त्यामध्ये  २-३ मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले , २ सुख्या लाल मिरच्या, ३ मध्यम आकाराची टोमॅटो बारीक  चिरलेली , ७-८ काजू व १ चमचा आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटे परतून घ्या. ते मिश्रण थंड झाल्यावर त्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा.

४. चिकन फ्राय

मॅरिनेट झालेले चिकन फ्रिज मधून बाहेर काढून घ्या. नॉन स्टिक च्या तव्यामध्ये २ चमचे तेल घालून सर्व चिकनचे तुकडे परतून घ्या. चिकन सर्व बाजूने हलवून व्यवस्थित भाजून घ्या.

टीप : ज्यांना कुकर मध्ये चिकन शिजवायचे नसेल त्यांनी चिकन परतून घेताना त्यावर झाकण ठेऊन १० मिनिटे चिकन परतून घ्यावे म्हणजे चिकन कच्चे राहणार नाही.

५. बटर चिकन

शेवटी एका कढई मध्ये १ चमचा तेल व २चमचे बटर / तूप घाला . गॅस मंद आचेवर ठेवा व त्यामध्ये थोडी हळद आणि १छोटा चमचा लाल मिरची पावडर टाका. ते हलवून घ्या व त्यामध्ये अर्धा छोटा चमचा धना पावडर टाका १ मिनिट हलवून घ्या व त्यामध्ये बटर चिकन  ग्रेव्ही ( कांदा, टोमॅटो, सुखी मिरची , काजू, आलं लसूण पेस्ट )घाला. ही पेस्ट ३ मिनिटे भाजून घ्या जेंव्हा तेल सुटायला लागेल तेंव्हा त्यामध्ये चिकन चे फ्राय केलेले तुकडे घाला थोडे पाणी घाला व झाकण लावून ३-४ मिनिटे शिजवा. सर्वात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर/कस्तुरी मेथी टाका. ३-४ चमचे बटर/तूप घाला या १ मोठा चमचा टोमॅटो सॉस घालून हलवा. आणि १ मिनिटांनी गॅस बंद करा.

टीप : तेल ऐवजी यामध्ये तुम्ही फक्त बटर/तूप घालू शकता. बटर चिकन जास्त तिखट नसते तरीही तुम्हाला तिखट हवे असेल तर यावर शेवटी गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता.




                                                                  बटर चिकन


बटर चिकन बनवण्यासाठी तुम्हाला १ तास लागेल. हि डिश तुम्ही बटर नान सोबत खा खूप छान लागते.

धन्यवाद !!

Thursday, 11 June 2020

मठरी


साहित्य : गव्हाचे पीठ, ओवा , लाल मिरची पावडर , मीठ , कोथिंबीर, तेल

कृती : प्रथम एका ताटामध्ये अंदाजे २ कप गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर पिठामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा , एक मोठा चमचा लाल मिरची पावडर , चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि २ चमचे थंड तेलाचे मोहन घाला सर्व पीठ हाताने मिक्स करून घ्या . पिठाचा गोळा बनतो का पहा . नंतर थोडे थोडे पाणी घेऊन पिठाची घट्टसर कणिक मळा . १० मि. कणिक तशीच ठेऊन द्या. तोपर्यंत गॅस वर तेल गरम करत ठेवा . आता कणकीचे चपाती एवढे गोळे बनवून घ्या व त्याची पातळ चपाती लाटा . ३ चपात्या लाटल्या नंतर एका चपातीला एका बाजूने तूप लावा व त्यावर दुसरी चपाती ठेवा , नंतर त्याही चपातीला वरून तूप लावा व त्यावर तिसरी चपाती ठेवा त्याला सुद्धा वरून तूप लावून घ्या.  त्या तिन्ही चपात्या गुंडाळून लाथिम्बी बनवा. लाथिम्बी मळून घोळून घ्या व त्याचे सुरीने छोटी पुरी बनेल एवढ्या आकाराचे तुकडे पाडा. नंतर एक एक तुकडा घेऊन गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने लाटा . छोट्या पुरी प्रमाणे आकार येईल असा पातळ गोळा लाटून झाला कि गरम तेलात मंद आचे वर तळून घ्या. मठरी थंड झाल्यानंतर चहा सोबतही खाऊ शकता.

टीप: मठरी मंद किंवा मध्यम आचे वरच भाजा . चपातीला तूप लावल्यामुळे त्याला पडदे सुटतात व ते कुरकुरीत होतात. मठरी खूप दिवस टिकते त्यामुळे तुम्ही एकदम बनवून साठवून ठेऊ शकता. स्टेप बाय स्टेप कृती खालील प्रमाणे....


स्टेप १. साधारण एवढ्या आकाराची गोल चपाती लाटून घ्या. 


स्टेप २. चपातीच्या वरच्या बाजूला तूप लावा. 


स्टेप ३. त्यावर दुसरी चपाती ठेऊन त्याला वरून तूप लावा नंतर त्यावर तिसरी चपाती ठेऊन पुन्हा तूप लावा . 


स्टेप ४. चपातीला हळू हळू गुंडाळून लाथिम्बी बनवा. 


स्टेप ५. अश्या प्रकारे गुंडाळा करून थोड घोळून पातळ बनवा. 


स्टेप ६. सुरीच्या सहाय्य्यने छोटे तुकडे पाडा . 


स्टेप ७. एक गोळा लाटा व एवढ्या आकाराची पातळ पुरी बनवा 


स्टेप ८. मंद व मध्यम आचेवर पुरी तळूनघ्या. 




मठरी हा ब्रेकफास्टला खाण्यायोग्य  खूप छान पदार्थ आहे. गहूचे पीठ वापरले असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला आहे व पचनक्रिये साठी सुद्धा हलका आहे. 

तर तुम्ही नक्की घरी बनवा या रेसिपियसाठी फक्त १५ मिनिटे पुरे आहेत . 



धन्यवाद !



Friday, 5 June 2020

तुम्हारे जैसे कमीनियोंका सहारा है दोस्तों

आज खूपच दिवस वाईट गेला ! छे ! खूप कंटाळा आला आज !!
 मोबाईल , लॅपटॉप , नेटफ्लिक्स , व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम, ट्विटर , टिक- टॉक, हॅलो सर्व सोशिअल मीडिया चाळून चाळून  बोअर झालं. माणूसच असा प्राणी आहे त्याला सारखं बोअर होत. बर बोअर झालय म्हणायची सोय नाही नाहीतर घरचे कामाला जुंपतील ही मनातील भीती त्यापेक्षा तेच तेच व्हाट्सअप बघितलेले परवडलं !! नाही का ? 

अहो बोअर होतंय म्हणून काम केलं कि कंटाळा जातो का ? काय माहिती जातही असेल. रिकाम्या माणसांनाच बोअर होत असं घरचे म्हणतात .. पण जर सारखं तेच तेच काम रोजच करायला सांगितलं तर आपल्याला लगेच बोअर होत . हे म्हणजे असं झालं मला कसतरी होतंय आजार झाल्यासारखं ... नेमकं कोणतं औषध द्यावं पेशंटला ? डॉक्टरलाच  प्रश्न पडण्यासारखा आजार आहे बुवा. 

अगदी तसच बोअर झालं याच असावं.सहसा बोअर झालं की  तेच तेच काम नको असत काहीतरी  इंटरेस्टिंग वाटावं असं काहीतरी हवं असत. म्हणजे kit -kat ब्रेक हवा असतो म्हणा हवं तर ....  प्राण्यांना कधी होत असेल का बोअर ? वैरण खाऊन त्याचा तासानं तास रवंथ करत बसायला तुम्हाला सांगितलं तर किती बोअर होईल ना? जस्ट इमॅजिन !!

 अगदी त्याच प्रमाणे बोअर झालं म्हणून सहजच मोबाईल फोन चा कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसले. किती मित्र-मैत्रिणी आहेत पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळच नसतो एकमेकांशी  बोलायला. शाळेत असताना कधी सुट्टी येऊच नये असं वाटायचं कारण फ्रेंड ची गाठ पडणार नाही . फ्रेंड  ग्रुप मधील कोणी आजारी पडू नये नाहीतर करमत नाही असं वाटणारी मंडळी हळू हळू कॉलेजला गेली कि त्यांचे तिथे नवीन फ्रेंड्स होतात मग शाळेतील फ्रेंड्स ला कमी वेळ दिला जातो आणि हळू हळू ती मैत्री कमी होते. नाहीशी होत नाही पण अभ्यास आणि बाजूच्या वातावरणात समरस झाल्यामुळे त्या मैत्रीला तेवढा  गंध उरत नाही. पुढे जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलात तर कॉलेज मधील फ्रेंड्स सुद्धा हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. असच असत ना सर्वांचं ?

 आणि मग लग्न झालं तर विषयच सोडा!! वाढत्या जबाबदाऱ्या आणि नवीन घरचे रुल्स फॉलो करण्यात अर्ध आयुष्य जात आणि तिकडेही नवीन फ्रेंड्स मिळतात मग मागचे फ्रेंड्स हळू हळू कमी होतात . हे म्हणजे आयुष्यच आता असं झालाय पुढचं पाठ आणि मागचं सपाट !

काही फ्रेंड्स कॉम्पिटिशनच्या जगात वावरत असताना बदलून जातात तर काहींना ती जुनी मैत्री जपणे म्हणजे काम वाटू लागते. काही जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण त्यांचं अस्तित्व नसल्या सारखे आणि काही औपचारिक मेसेज करून कोमजलेलं झाड जस तग धरून असत त्याप्रमाणे ती मैत्री टिकवून ठेवतात. असून नसल्याप्रमाणे !!

काही जण कामापुरते फोन कॉल्स करतात तर काही जण खरंच आठवण येते म्हणून कॉल्स करतात. काहींना ओल्ड इस गोल्ड प्रमाणे नवीन फ्रेंड्स पेक्षा जुन्या मैत्रीचंच अप्रूप असत तर काहींना ओल्ड इस ओल्ड फॅशन प्रमाणे न्यू हवं असत. अश्या प्रकारची कंडिशन सर्वांच्याच आयुष्यात येते. काय खरंय ना !! ?

सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन गेले आहेत असो !!

माझ्या आयुष्यात फ्रेन्ड्स या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हणता येईल कारण पटकन कोणी विचारलं तुझी बेस्ट फ्रेन्ड कोण आहे तर मला सांगता येत नाही कारण सर्वच फ्रेन्ड्स बेस्ट आहेत. तरीही काही मैत्रिणी किंवा मित्र असे असतात ज्यांचे आपल्या आयुष्यात अस्तित्व नसते पण त्यांचा फार मोठा रोल असतो.

अशीच माझी मैत्रीण किरण . तिचे तसे मला फार मेसेज किंवा कॉल्स नसतात किंवा माझं आणि तीच रोज रोज बोलणंही होत नाही पण मला जेंव्हा खूप एकटं वाटत , खूप बोअर होत किंवा कोणाबरोबर तरी मन मोकळं कराव वाटत तेंव्हा किरण नेहमी फ्री असते. हा निव्वळ योगायोग असेल किंवा ती माझ्या साठी वेळ काढत असेल. मला तसा तिचा खूपच आधार वाटतो .

कॉलेज मध्ये असताना आम्ही मैत्रिणी होतो आणि आमची गावही जवळ जवळ आहेत त्यामुळे आमची मैत्री अजून टिकून आहे. किरण पहिल्यापासून शांत स्वभावाची आणि समजूतदार असल्यामुळे तिचे सल्ले सुद्धा तिच्या स्वभावाप्रमाणेच असतात. प्रत्येक गोष्टीवर तिचा शांत रहा हा सल्ला अगदी अचूक ठरतो. करिअर पासून ते अगदी लग्नापर्यंत चे निर्णय आम्ही एकमेकी चर्चा करून ठरवतो . अर्थात निर्णय स्वतःचा पण एक मोकळी चर्चा प्रत्येक विषयावर नेहमी करायची सवय आहे. काही गोष्टींचे निर्णय झाल्या नंतर जर निर्णय चुकीचा असेल तरीही जज न करण उलट धीर देत राहणं आणि त्यावर उपाय शोधायला मदत करणं फारच थोड्या जणांना जमत असं मला वाटत.

किरण आणि माझं लग्न अगदी १५ दिवसांच्या फरकाने झालं आहे आमच्या दोघींचं संसारिक  जीवन सारखच चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला येणाऱ्या समस्या सारख्याच असल्यामुळे काही गोष्टींना तोंड देणं सोपं होऊन जात. सोलमेट ज्याला म्हणतात ते हेच असावं कदाचित ! एस किरण माझी सोलमेट आहे. प्रत्येकाला अशी मैत्रीण मिळेल असे नाही. मी भाग्यवान आहे मला ती मिळाली. !!!

तशीच पण थोड्या वेगळ्या स्वभावाची आणखी एक मैत्रीण मला माझ्या आयुष्यात लाभली ती म्हणजे नम्रता. कॉलेज मध्ये भेटलेली अस्सल मुंबईकर अशी नम्रता आयुष्याबद्दल फारशी सिरीयस नाही असं जरी वर वर वाटत असल तरी मनातून ती खूप हळवी आणि जबाबदार व्यक्ती आहे.

माझ्या आयुष्यात तिचे स्थान किरण इतकेच महत्वाचे ! खूप कॉमेडी स्वभावाची नम्रता कितीही दुःखात असेल तर हसवून हसून दुःख थोड्यावेळा साठी का होईना विसरायला लावणारी ती माझ्या आयुष्यात कधी आली कळलं नाही. आमची मैत्री पहिल्यापासून टिकून आहे. मनातलं बोलायला लावणारी आणि दुःख विसरायला लावणारी नम्रता तिच्या बऱ्याच गोष्टी शेअर करते. मला हि तिला मदत करायला आवडत त्यामुळे आमचं थोडं जास्तच पटत. नम्रताच्या आणि माझ्या कॉलेजच्या तश्या फारच आठवणी आहेत आजही आठवल्या तरी चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय रहात नाही. 

एक किस्सा अजून आठवतो खूप अभ्यास करणारी नम्रता एकदा आमची युनिट टेस्ट  चालू असताना रात्र भर अभ्यास करून सकाळी झोपली ती परीक्षेला पोहोचलीच नाही. पेपर झाल्यावर टेन्शन मध्ये असलेल्या नम्रताला आम्ही विचारलं काय झालं पपेरला का नव्हती ? तर चक्क अभ्यास करून झोप लागली असं सांगितलं  तेंव्हा आम्ही तिला खूप पिडून  काढलं होत आणि मॅडमला देखील तिनी हेच कारण सांगितलं होत. तीच मुंबई स्टाईल  मधील बोलणं सर्वांनाच खूप आवडायचं. एक बिनधास्त जीवन कस जगावं हे तिच्याकडे पाहून मला समजत. मी अपसेट असेल तेंव्हा या बयो चा फोन हमखास येतो.

या दोघींचा मला खूप आधार असतोच त्याच बरोबर एकमेकींना चिडवणं , खेचा खेची करणं , एकमेकींचा दुःख सांगून त्यावर सोलुशन जरी नाही निघालं तरी एकमेकींना हसवून थोड्यावेळापुरतं का होईना ते दुःख विसरायला लावणाऱ्या माझ्या मैत्रिणी सात जन्मी मिळाव्यात म्हणून मी कोणत्याही झाडाला फेऱ्या मारायला तयार आहे. या दोघींचा आवडता आणि कॉमन डायलॉग म्हणजे अशू तू वेडी आहेस का ? आणि दुसरा म्हणजे अशू तू ग्रेट आहेस. दोन्ही डायलॉग ऐकून मला बरं वाटत. 

तुमच्याही आयुष्यातअश्या मैत्रिणी मित्र असतील ना ? हा लेख मी खास माझ्या आयुष्यात अस्तित्व नसणाऱ्या पण इम्पॉर्टन्ट रोल असणाऱ्या मैत्रिणींसाठी समर्पित करते. त्यांचे आभार मी मानू  शकत नाही कारण दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स होता हैं .







                                                

Wednesday, 3 June 2020

Home Made पनीर

पनीर हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ सर्वांनाच माहित आहे आणि बऱ्याच लोकांना पनीर पासून बनवलेले पदार्थ आवडतात देखील. पनीर पासून पनीर पुलाव , पनीर मसाला, पनीर टिक्का, पालक पनीर, मटार पनीर, पनीर भुर्जी , कढाई पनीर, पनीर बिर्याणी, पनीर मक्खनवाला , हैद्राबादी पनीर मसाला इत्यादी इत्यादी बरेच पदार्थ बनतात. पनीर हा फॅट्स, कॅलशिअम  , व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन चा प्रमुख स्रोत आहे. आरोग्यासाठी उत्तम मानले जाणारे पनीर तुम्ही अगदी रोजही खाऊ शकता कारण या मधील प्रथिण्यांची मात्र हि हिरव्या पालेभाज्यांमधील प्रथिने इतकीच आहे. पनीर गाई किंवा म्हैशीच्या दुधापासून बनवू  शकता. कमी फॅट्स असलेल्या दुधापासून बनवलेले पनीर वजन कमी करणे आणि स्नायू बळकट करणे साठी वापरतात. अफगाणिस्तान , मध्य आशिया, अमेरिका व युरोप या देशात पनीर चे उत्पादन जास्त प्रमाणात होते तर भारतात काश्मीर या थंड हवेच्या ठिकाणी पनीर जास्त प्रमाणात खाल्ले  जाते.  ज्या लोकांना मांस खाणे पचत नसेल किंवा आवडत नसेल  लोकांनसाठी पनीर हा बेस्ट ऑपशन आहे.  मग चला तर जास्त वेळ न खर्च करता आपण घरीच फ्रेश आणि healthy पनीर बनवूया !!!!!


साहित्य : दूध, लिंबू आणि पाणी. 

कृती : पनीर बनवण्यासाठी दुधाला एक उखळी येईपर्यंत तापवणे. साधारण एक लिटर दुधाचे पनीर अंदाजे पावकिलो बनते. 

 तापलेले दूध थोडे थंड होईपर्यंत तीन मध्यम आकाराच्या  लिंबाचा रस काढून गाळून घ्या. जेवढा रस आहे तेवढेच पाणी लिंबाच्या रसामध्ये घालून मिश्रण तयार करा . आता लिंबूचा रस थोडा थोडा घालत दूध हलवत रहा. दूध फाटेपर्यंत दुधात लिंबूचा रस घाला. दूध तरीही फाटले नाही तर दूध फाटेपर्यंत दूध गरम करा . आता दूध फाटून पाणी वेगळे झालेले दिसेल. नंतर  गाळणीच्या सहाय्याने दूध गाळून घ्या व गाळणीमध्येच पाणी टाकून दूध धुऊन घ्या. दूध जास्त धुतले तर त्यामधील प्रोटीन निघून जातील यासाठी थोडेच पाणी घालून दूध धुऊन घ्या म्हणजे लिंबाच्या रसाचा वास येणार नाही . 

आता गाळणी मधील दूध सुती रुमालामध्ये घालून सर्व पाणी पिळून घ्या व त्याची घट्ट पुरचुंडी बांधून रुमाल लटकावून ठेवा. मी सिंकच्या नळाला हा रुमाल बांधून ठेवला होता त्यामुळे जे जास्तीचे राहिलेले दुधातील पाणी निघून गेले. साधारण एक तास झाल्यानंतर रुमाल काढून बघा तुम्हाला दुधाचा घट्ट गोळा दिसेल. आता हा गोळा फोडून घ्या आणि त्याला वडी प्रमाणे चौकोन आकार द्या. त्यानंतर हा आकार तसाच रुमालामध्ये घडी करून बंद करा आणि त्यावर जड वजन ठेवा. तुम्ही दगडाचा खलबत्ता, पाण्याचे भांडे हि ठेऊ शकता.

 साधारण ४-५ तासानंतर रुमाल उघडून पाहिलं तर तुम्हाला पनीरची वडी दिसेल. ही वडी सुरीच्या सहाय्याने कापून छोटे छोटे तुकडे करा. मी इथे स्टेप बाय  स्टेप कृतीचे फोटो देत आहे म्हणजे तुम्हाला ही कृती लक्षात येईल. 



स्टेप १: एक लिटर तापवलेले दूध


स्टेप २: लिंबू आणि पाण्याचे मिश्रण


स्टेप ३: लिंबाचा रस अश्या प्रकारे घालून दूध हलवत रहा. 


स्टेप ४: दूध फाटेपर्यंत लिंबाचा रस घाला आणि अश्या प्रकारे दूध फाटून दूध आणि पाणी वेगळे होईल. 


 स्टेप ५: फाटलेले दूध सुती रुमालामध्ये बांधून १-२ तास अश्या प्रकारे टांगून ठेवा. 


स्टेप ६: नंतर सुकलेले दूध फोडून त्याला चौकोन आकार द्या व रुमालात ठेऊन अशी घडी घाला. 


स्टेप ७: त्या घडी वर वजन ठेवा. 


स्टेप ८: ४-५ तासांनी अशी पनीरची वडी झालेली दिसेल. 


स्टेप :९ सुरीच्या साहाय्याने पनीरचे छोटे छोटे तुकडे करा. 

पनीर किती काळ साठवून ठेवणार आहे या नुसार पनीरवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते . दूध  नासवण्यासाठी लिंबू, व्हिनेगर किंवा सायट्रिक ऍसिड व योगर्ट वापरले जाते.
 नक्की करून पहा!!!

धन्यवाद !!