Saturday, 16 May 2020

तवा बटर नान


आज बऱ्याच दिवसांनी मला बटर नान आणि पनीर खाण्याची इच्छा झाली. पण बटर नान कसे बनवावे ? 
नेहमी हॉटेल्स मध्ये गेल्या नंतर व्हेज फूड ची ऑर्डर देताना पनीर मसाला आणि तंदूर नान किंवा बटर नान हे मेनू फिक्स असतात , आणि घरी जर पनीर मसाला बनवला तर महाराष्ट्रीयन असल्यामुळे या सोबत चपाती खाणे पसंद करतात काही जण घरीच बटर नान बनवत असतील देखील . पण मी बनवत नाही. शॉर्टकट मारण्यासाठी पनीर आणि चपाती बेस्ट. 

इ .स . १३०० मध्ये इंडो -पर्शियन कवी अमीर कुश्रवा यांच्या नोट्स मध्ये नान चा पहिला इतिहास नोंदवलेला सापडतो. हे मुळतः नान -ए -टुणूक (हलके ब्रेड ) आणि नान-ए -तनुरी (तंदूर भांड्यात शिजवलेले) म्हणून दिल्ली च्या इंपिरियल कोर्टात शिजवले गेले होते. नान  हा ओव्हनबेक केलेला फ्लॅटब्रेड आहे. नान हा पर्शिय भाषेचा शब्द आहे. नान हा प्रामुख्याने मध्य आशिया आणि दक्षिण आशिया मध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. एका बटर नान मध्ये ९३ कॅलरी असतात. त्यांपैकी ५६ कॅलरी कर्बोदके देतात, ९कॅलरी प्रथिने आणि उरलेली २७ कॅलरी चरबीमधून येतात. एक बटर नान एका प्रौढ व्यक्तीच्या दररोजच्या आहारात लागणाऱ्या २००० कॅलरी मधील ५% कॅलरी देते.  

नान बनवायचे ९ प्रसिद्ध प्रकार आहेत. १) नवाबी नान २)बटर नान ३)रोगनि नान ४)चिली चीज नान ५)मसाला पनीर नान ६)काश्मिरी नान ७)चूर चूर नान ८)कीमा नान ९)एग नान 

नान बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत तसे नान भाजण्याच्याही पद्धती असतात . नान भाजण्यासाठी लोखंडाचा तवा वापरत असाल तर त्याला तवा बटर नान म्हणतात अर्थात नान ला बटर म्हणजे लोणी लावले जाते. जर तुम्ही नान भाजण्यासाठी तंदुर ओव्हन वापरत असाल तर त्याला तंदूर बटर नान असे म्हणतात.

तुम्ही बटर नान सोबत पनीर मसाला, पालक पनीर, पनीर कडाइ , मटार पनीर, पनीर टिक्का मसाला व्हेज हैद्राबादी, मश्रुम मसाला किंवा मश्रुम कडाइ इत्यादी पदार्थ खाऊ शकता अजूनही बऱ्याच भाजी सोबत तुम्ही बटर नां खाऊ शकता. 

चला तर !! बटर नान बनवूया !!



साहित्य : मैदा , बेकिंग सोडा , मीठ , दूध, दही , बेकिंग पावडर ,  बारीक रवा , साखर, कोथिंबीर  इत्यादी .



कृती :  एका पराती मध्ये अर्धा किलो मैदा चाळून घ्या. त्या मध्ये मीठ , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर  टाका . नंतर साधारण १ मोठी वाटी दही घ्या त्यामध्ये १ मोठा चमचा रवा भिजवा. हे मिश्रण ५-१० मिनिटे तसेच झाकून ठेवा. एका भांड्या मध्ये २ कप दूध गरम करा त्यामध्ये १ चमचा साखर विरघळत ठेवा .



आता रवा भिजवलेले मिश्रण पिठात ओता . ते संपूर्ण पिठामध्ये मिसळून घ्या . नंतर साखर विरघळवलेले दूध थोडे थोडे घालून घट्ट कणिक मळा .



जर पीठ अजून कोरडे वाटत असेल तर गरम दूध घालून सर्व पीठ मळून मऊ होईपर्यंत घोळून घ्या .

मळलेल्या पिठाच्या गोळ्यावर सुती  भिजवलेले कापड टाका . हे पीठ शक्य असल्यास गरम जागेत ठेवा.
साधारण १ तास पीठ भिजवल्या  नंतर नान बनवायला  घेऊ  शकता.



नान बनवण्यासाठी :


प्रथम सर्व पिठाचे गोळे बनवून ठेवा. गोळे साधारण चपातीच्या गोळ्या पेक्षा थोडे  लहान असायला पाहिजे.

पोळपाटावर मैद्याच्या गोळ्याची चपाती मैदा लावून लाटा . चपाती जास्त पातळ लाटू नये व जास्त जाड हि ठेऊ नये . चपातीच्या एका बाजूला काळे तीळ व कोथिंबीर घालून लाटण्याने दाबून घ्या . नंतर चपाती उलटी करून त्याला दुसऱ्या बाजूने मिठाचे पाणी लावा.
लोखंडाचा तवा तापवायला ठेवा . तवा तापला कि त्यावर पाण्याची बाजू तव्यावर येईल अश्या पद्धतीने नान तव्यावर टाका . थोड्याच वेळात नानला वरच्या बाजूला फुगे (बबल्स ) येतील व खालील बाजू भाजली जाईल. नंतर तवा उचलून गॅसवर उलट धरून नान  भाजा . भाजलेली नान तव्यावरून काढा आणि त्याला बटर  लावा.


टीप १ : बेकिंग सोडा नसेल तर इनो वापरू शकता. बेकिंग पावडर ऑपशनल आहे.   तव्याला कोणत्याही  प्रकारचे तेल , बटर लावू नये . नान  ला एका बाजूने पाणी लावले कि नान  तव्याला चिटकून बसते व दुसऱ्या बाजूने गॅसवर तवा  उलट धरून भाजता येते.


टीप २: गार्लिक बटर नान साठी लसणाचे छोटे छोटे तुकडे नान ला लावून त्यावर काळे तीळ , कोथिंबीर घालून लाटण्याने प्रेस करावे व वरील प्रकारे नान भाजावे. 

  तवा बटर नान

या प्रमाणे नान तवा उलट धरून गॅसवर भाजणे 


तुम्ही हि रेसिपि नक्की करून पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया खाली असलेल्या कंमेंटबॉक्स मध्ये लिहून कळवा. 

धन्यवाद !

No comments:

Post a Comment