Saturday, 9 May 2020

परवलीचा शब्द

आई .... सांग ना  वीरा दि ला ? अगं ही  मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.
मला आपले काल बर्थडे पार्टी मध्ये  काढलेले फोटो पाहायचे आहेत. 

जोर जोरात ओरडून आई कडे तक्रार करणारा विनू वीराचा मोबाईल फोन घेऊन आईच्या दिशेने पळत सुटला होता. सकाळची वेळ होती.... वीरा अजून अंथरुणातच लोळत पडली होती. आजी देवघरात देवपूजेत मग्न होती आणि आई स्वयंपाक घरात नाश्ता बनवण्यात गढून गेली होती. वीराचे बाबा ऑफिस ला निघून गेले होते. 
धावणाऱ्या विनूला मधेच थांबवत आई म्हणाली ...

काय रे विनू लहान आहे का तुम्ही ? सकाळी सकाळी किती गोंधळ करता....  आई . 

आई सांग ना ग त्याला माझा फोन घेतला आहे विनूने.... वीरा. 

विनू कशाला घेतला आहे तिचा फोन ? आई 

तिनी फोन ला किती पासवर्ड घातले आहेत बघ ना ? विनू 

तुला रे काय करायचं आहे ? वीरा 

मला काल झालेल्या बर्थडे पार्टीचे फोटो बघायचे आहेत . विनू 

मी दाखवते तुला !! दे माझा फोन.... वीरा 

नाही !! मला पासवर्ड सांग आधी ? विनू 

विनू आर  यु मॅड ? पासवर्ड काय सांगण्या साठी घालतात का ? ..... वीरा 

आई बघ ना! दीदी कशी बोलते. मी काय हिचा डेटा चोरी करणार आहे का ? विनू 

शांत बसा रे दोघे पण ! सकाळी सकाळी काय पासवर्ड पासवर्ड लावलं आहे . आई 

सर्व गोंधळ ऐकून देवघरातून बाहेर येणारी आजी हातावर लाडूचा प्रसाद टेकवत म्हणाली . बाळांनो काय झालं? का बरे भांडण करत आहे ?

त्यावर विनू आजीचा लाडका लगेच आजीच्या पाठी लपत बोलला बघ ना अगं आजी दीदी मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.

आता धार्मिक असलेली आजी फारशी शिकलेली नव्हती त्यामुळे कदाचित तिला यांचं नेमकं कशावरून भांडण चालू आहे हे कळतं नव्हतं. 

बरं या गोष्टी वर आपण नंतर बोलूया ! आधी विनू तू वीराचा फोन तिला परत कर  . असे बोलून आजीने वाद थांबवला . फोन मिळताच वीरा विनूला वाकुल्या दाखवत आपल्या खोलीत निघून गेली. आपली बाजू कोणीही घेतली नाही असे समजून ओशाळलेला विनू बागेत जाऊन बसला. सर्वांचं काम आटोपल्यानंतर दुपारचं जेवण झालं. गर्मीचे दिवस असल्यामुळे सर्व मंडळी बागेत आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. आजी आणि आई शेंगा फोडत बसल्या होत्या . वीरा फोन मध्ये गुंग झाली होती. विनू फारसा बोलत नव्हता. सकाळी झालेला प्रकार त्याला रुचला नसल्यामुळे तो अजून त्याच भानात होता. 

आता आजीने विनूकडे पाहून सकाळी झालेला प्रकार विचारायला सुरुवात केली. विषय निघताच विनूची कळी खुलली आणि तो हि कान टवकारून ऐकू लागला. आजी मुद्दाम आईला विचारू लागली . 

 काय गं ! सकाळी काय गोंधळ चालला होता. आजी 

आईने हि आज्ञाधारक सुने प्रमाणे तिची सेवा बजावत झालेला सर्व प्रकार अगदी जसाच्या तसा सांगितला. आता आजी प्रश्न विचारणार पक्क होत. 

वीरा कसला पासवर्ड टाकला आहेस फोन ला ? आजी 

काही नाही ग आजी ? वीरा 

वीराने विषय टाळण्यासाठी उत्तर दिल आणि पुन्हा फोन मध्ये डोकं घालून बसली. 

मग आजी म्हणाली आम्ही म्हातारी माणसं आम्हाला काय कळतंय या फोन मधलं . पण माझ्या एवढे म्हातारे लोक सुद्धा  फोन वापरतात . मी पहाटे फिरायला जाते तेंव्हा बरीच मंडळी गळ्यात फोन अडकून फिरायला येतात. 
हे ऐकून वीरा आणि विनूला आजीची गम्मत वाटली आणि त्यांना आपली आजी आता या मोबईल फोन आणि पासवर्ड बद्दल खडा न खडा माहिती घेणार त्यांना कळून चुकले.

आजीचा  नवीन जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा नेहमीच अट्टाहास असतो. ती तिच्या अध्यात्मकतेच्या गोष्टी जश्या आम्हाला सांगते तशात नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टीही ती आमच्याकडून आत्मसात करत असते .

मग ती पुढे बोलू लागली . आमच्या काळात असे फोन वगैरे नव्हते. आम्ही आमची खुशाली पत्र लिहून कळवत. त्यासाठी बरेच दिवस लागत. मग त्यांचा संदेश येईपर्यंत बरीच वाट पाहावी लागायची . पण आता हे काम अतिशय सोपं झालं आहे या मोबाईल फोन द्वारे. क्षणाचा ही  विलंब न करता सर्व काही घरात बोलल्या प्रमाणे समोरच्याला आपण आपलं बोलणं सांगू शकतो आणि तो हि लगेच त्यावर प्रतिउत्तर देतो. काय म्हणायचं या मोबाईल फोन ला . हा तर साक्षात गणपतीने मानवाला दिलेला प्रसाद असावा .  ती तिच्या आध्यात्मकतेच्या गोष्टीला अनुसरून बोलू लागली.

रुसून बसलेला विनू आता त्याचा अबोला सोडून बोलू लागला....

आजी हा गणपतीचा प्रसाद नाही ग ! मोबाईल फोन हा मानवानेच तयार केला आहे. आधी पत्राद्वारे संभाषण करत असताना खूप वेळ खर्च व्हायचा पण या मोबाईल फोन मुळे आता खूप वेळ वाचतो आणि आपण हा मोबाईल कुठेही घेऊन जाऊ शकतो . आता हे तर तुला नव्याने सांगायला नको . तुला माहित आहे कि हे! मी सांगितलं आहे तुला आधी !!

फोन मध्ये व्यस्त असलेली वीरा आता आजीला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे समजून म्हणाली ...
अरे विनू आजीला पासवर्ड म्हणजे काय ? हे जाणून घ्यायचं आहे . तू आता तिला मोबाईल च काय सांगत आहेस ? ते तिला माहिती आहे .

मग आजीने हि आता भोळेपणाचे सोंग सोडून थेटच विचारलं ...

काय आहे हा पासवर्ड ? आजी

त्यावर वीरा म्हणाली पासवर्ड म्हणजे एक गुपित कोड असतो किंवा पॅटर्न असतो आपली माहिती चोरी होऊ नये म्हणून तो मोबाईल फोन मध्ये टाकला जातो . म्हणजे तुमचा फोन सुरक्षित राहतो.

आजी गोंधळून गेली तिला वीरा च बोलणं कळालं नव्हतं. तिचा गोंधळलेला चेहरा आणि चेहऱ्यावरील प्रश्नचिह्न पाहून विनू म्हणाला.

पासवर्ड म्हणजे परवलीचा शब्द !!

हे ऐकताच आजी म्हणाली परवलीचा शब्द !! तो तर शिवाजी महाराज्यांच्या काळात गुप्तहेर वापरायचे. शत्रूच्या छावणी मधील गुपित माहिती काढून पुढे महाराजांच्या गडावर सुरक्षित पोहचावी म्हणून परवलीचा शब्द वापरायचे.

पण मोबाईल फोन मध्ये परवलीचा शब्द वापरायला मोबाईल फोन मध्ये पण शत्रूचे गोठ आहेत का ? आजी हसत हसत बोलली .

त्यावर वीरा म्हणाली अगं आजी ! मोबाईल फोन चे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. मग हा परवलीचा शब्द कामाला येतो बघ ! वीरा

तो ग अन कसा ? नीट  समजेल अश्या भाषेत सांग कि ?  आजी

हे बघ ! आता बाबा आपल्या घरी बसून टीव्ही चे , फोन चे , विजेचे बिल मोबाईल फोन वरून भरतात कि नाही ? विनू

हो रे आज काल तो  घरीच बसून ऑनलाईन का बिनलाईन म्हणतात तसाच बिल भरतो . आजी

तेच ग ! ऑनलाईन बिल भारतात म्हणजेच फोन मधून ते डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्या मधून पैसे काढून वीज कंपनी , मोबाईल कंपनी ला देतात आणि बिल भरतात. त्याची पावती सुद्धा मोबाईल मध्ये मिळते. विनू

मग जर तुमच्या बँकेच्या खात्याचा तपशील दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर ... वीरा

बापरे ! कोणीही आपल्या परस्पर आपल्याच खात्यातून पैसे काढून घेऊ शकते . आई

म्हणून परवलीचा शब्द उपयोगी आहे . तो फक्त आपल्यालाच माहित असणार . परवलीचा शब्द असेल तर तुमच्या खात्याचा तपशील कोणीही घेऊ शकत नाही . विनू

आता हे झालं बँकेचं ! असे बरेच ऑनलाईन व्यवहार असतात ज्या मध्ये तुम्हाला तुमचा परवलीचा शब्द वापरून काम करायचं असत . वीरा

 लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाईल या वस्तू मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये काम करणाऱ्यांना कंपनी तर्फे मिळतात. त्या वस्तू  फक्त त्यांनी कंपनी च काम करण्यासाठीच वापरायच्या असतात . त्याला सुद्धा परवलीचा शब्द असतो . कंपनी ची माहिती बाहेर दुसऱ्या कंपनी ला कळू नये यासाठी घेतलेली ती खबरदारी असते.  विनू

किती महत्वचा आहे परवलीचा शब्द !! आई

आणि शत्रूच म्हणशील तर या मध्ये शत्रूच नाव आहे हॅकर ! विनू

शिवाजी महाराजांच्या काळात शत्रू बरेच होते त्यांची उघड लढाई होत असे . आदिलशाही, निजामशाही आणि मोघलाई हे त्यावेळचे शत्रू होते. पण आता या मध्ये शत्रू आहेत हॅकर . हे हॅकर तुमच्या आमच्या सारखीच माणसं  असतात. त्यांना आपण ओळखू शकत नाही. छुप्या रीतीने ते आपला परवलीचा शब्द चोरून आपले पैसे ढापू शकतात. सोसिअल मीडिया वर आपली बदनामी करू शकतात. असे अजून बरेच गैरप्रकार करू शकतात . असे करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वीरा

सोशिअल मीडिया म्हणजे ? आजी

सोशिअल मीडिया म्हणजे असे अँप्लिकेशन असतात जे वापरून  दूर देशातील लोकांनसोबत तुम्ही मैत्री करू शकता त्यांच्या सोबत गप्पा मारू शकता. तुम्ही तिथे काय चाललं आहे हे विडिओ कॉल करून बघू शकता. असे करण्या साठी तुम्हाला इंटरनेट सोबत कनेक्ट असले पाहिजे . विनू

अग! आपण आत्यासोबत नाही का इथे बसून बोलत ते. ती आपल्याला व्हाट्सअप कॉल करते. ते म्हणजे सोसिअल मीडिया . या सोशिअल मीडिया मुळे आपण जगाशी जोडले जातो . वीरा

पण याला कशाला परवलीचा शब्द लागतो. आजी

आता समजा मी वीरा दीदीला काही माझं गुपित सांगत असेल , काही महत्वाच्या कागतपत्रांचा फोटो तिला पाठवला असेल आणि तो गुपित ठेवायचा असेल तर परवलीचा शब्द वापरून मी तो गुपित ठेऊ शकतो. विनू

असं आहे तर ! आजी

पण मग फोटो साठी कशाला परवलीचा शब्द वापरला आहेस तू वीरा आणि तो पण विनू साठी ?

मी विनू साठी च म्हणून नाही वापरला . मी कॉलेज मध्ये जाते तिथे माझे खूप सारे मित्र-मैत्रिणी आहेत . कोणी चुकून माझा मोबाईल फोन घेऊन फोटो पाहिले. माझ्या फोन मधून माझे फोटो चोरी करून त्याचा गैरउपयोग केला तर ! कोण चांगलं आणि कोण वाईट हे तोंडावर लिहिलं नसत . सर्वात जवळचे लोकच फसवत असतात असे आपण बऱ्याच टीव्ही मालिकेत पहिले आहे. त्यासाठीची हि खबरदारी हवं तर समज. वीरा

पण दीदी मी तर यातलं काहीच करणार नव्हतो . तू मला पासवर्ड का नाही सांगितला ? विनू
अरे परवलीचा शब्द कोणाला सांगण्यासाठी असतो का ? आजीला विचार महाराज्यांच्या काळात त्याला किती महत्व होत ? वीरा

हो ग ! पण विनू आपलाच आहे. आजी

तसं नाही ग विनू लहान आहे आणि त्याला माझा परवलीचा शब्द कळला तर तो त्याच्या न कळत माझा  कोणताही महत्वाचा डेटा डिलिट करू शकतो . पॉप उप होणाऱ्या संदेशांना रिप्लाय करू शकतो . वीरा

बरं ठीक आहे तुला अजून १ परवलीचा शब्दाचं सांगतो . या वरून बरेच लोकांची भांडण होतात. आता दीदीच आणि माझंच बघ ना झालं ना भांडण ? असच   पासवर्ड सांगत नाही म्हणून भांडण होतात . कधी कधी हि भांडण इतकी विकोपाला जातात कि घटस्फोट सुद्धा होतात . प्रत्येकाला स्वतःची privacy महत्वाची आहे . विनू

मग ते पॅटर्न च काय म्हणत होती तू ? कसला पॅटर्न असतो ग वीरा ? आजी

परवलीचा शब्द  खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते तुम्ही आकडे, शब्दात किंवा पॅटर्न मध्ये ठेऊ शकता . लॅपटॉप किंवा मोबाईल फोन मध्ये ते आकडे , शब्द किंवा आकृतीच्या (पॅटर्न ) च्या स्वरूपात असतात . संशोधन केंद्रामध्ये एखाद्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी सुद्धा परवलीचा शब्द असतो. तो आकडे , आकृती , शब्द,  हाताचा पंजा, अंगठ्याचा ठसा, डोळे किंवा अख्खा चेहरा हे परवलीचा शब्द म्हणून वापरतात. वीरा

डोळे, चेहरा ,हाताचा पंजा हे कसं काय ग परवलीचा शब्द असेल ? आजी

अग आता हॅकर्स इतके हुशार आहेत कि ते आकडे, आकृती आणि शब्द लगेच चोरू शकतात. म्हणून हाताचा ठसा, अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्याचे बुबुळ आणि चेहरा हे सहज चोरू शकत नाही म्हणून हे सुद्धा परवलीचा शब्द असतात. यालाच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असं म्हणतात . विनू

आणि हो तुमचा आवाज हा सुद्धा परवलीचा शब्द म्हणून वापरू शकता. वीरा

बापरे ! काय हि प्रगती झाली आहे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये !! आजी

आजी ! हे  काहीच नाही अजून बरच काही आहे . पण आज साठी एवढं पुरे आहे !

चला आता ४ वाजले चहा पिऊया ? आई 

हो ग ! कसा वेळ गेला कळलंच नाही . आजी 

सर्वजण चहा प्यायला  निघून जातात . पण काय मंडळी तुम्ही तुमचा परवलीचा शब्द गुपित ठेवत आहे ना ? 

बँक मधून येणाऱ्या फोन वरून तुम्ही तुमची माहिती सांगत तर नाही ना ?  अश्या कोणत्याच कॉल ला प्रतिउत्तर देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्ही तुमचा परवलीचा शब्द सारखा सारखा बदलत रहा . 

अलर्ट रहा ! सावध रहा !

धन्यवाद ! 















No comments:

Post a Comment