आज सोयाबीनचे व्हेज कबाब ब्रेकफास्ट ला बनवशील का? मी माझ्या मित्राच्या घरी खाल्ले आहेत. खूप छान चव होती . असे बोलून वैभव त्याच्या खोली मध्ये निघून गेला. वैभवची आई मात्र स्वयंपाकघरात काहीतरी कामात व्यस्त होती. ती कोणत्या तरी विचारात असावी. तिनी त्याची मागणी ऐकली होती पण त्याकडे तिचे लक्ष्य नव्हते. कदाचित कामामुळे थकून गेली असावी. वैभव थोड्या वेळाने अंघोळ आटपून स्वयंपाक घरात आला आणि त्याने ग्लास वाजवून आईला भानावर आणले.
काय गं ! कसला विचार करत आहेस? वैभव
काही नाही रे ! आई
अगं सांग ना ? कसल्या विचारात आहेस? वैभव
अरे ! आपण रोज जेवण बनवतो त्यामध्ये कोणते पोषण तत्व असतात आपल्याला माहित नसते. आपण रोज ठराविक भाज्या बनवतो आणि त्या खातो . पण त्या भाजी पासून आपल्या शरीराला कोणते घटक उपयुक्त आहेत हे कोणालाच माहित नसते . किमान मला तरी माहित नाही. आई
हो ग! तुझं अगदी बरोबर आहे . वैभव
आणि अरे तुम्ही मुलं आजकाल हॉटेल्स मध्ये नवीन पदार्थ खाता आणि घरी येऊन तेच पाहिजे मागणी करता. आई
रोज त्याच त्याच भाज्या खाऊ वाटत नाहीत. बोअर होत ग ! ट्राय समथींग न्यू मॉम !!
असं बोलून वैभव निघून गेला. वैभव ची आई मात्र अजून विचारात होती. या मुलांना त्याच भाज्या फक्त नवीन पद्धतीने खाण्यास दिल्या कि त्यांना त्या स्पेसिअल वाटत असतात.
वैभव ची आई आता सोयाबीन या विषयात गढून गेली. तिला ४ च्या चहा सोबत सोयाबीन चे कबाब बनवायचे होते ना !
सोयाबीन ! याचे शात्रीय नाव आहे ग्लिसाइन मॅक्स. जगातील सोयाबीन चे ६०% उत्पादन तसे तर अमेरिका मध्ये होते. आणि भारताचं म्हणाल तर सोयाबीन हि कडधान्य मध्य प्रदेशात जास्त पिकवल जात . तुम्हाला माहिती आहे का ? भारतामध्ये सोयाबीनचे रिसर्च सेंटर सुद्धा आहे. मध्य प्रदेश मध्ये इंदूर या गावी आहे ते !
कडवटपणा दूर करून सोयाबीन ची कणीक वापरून पोळ्या, ब्रेड बिस्कीट, नानकटाई इत्यादी पदार्थ बनवता येतात. सोयाबीनची डाळ हि शेव, चकली व मिसळ बनवण्यासाठी उपयुक्त आहे. सोयाबीनचे खाद्य तेल आपण वापरत आहेच . या तेलाच्या बऱ्याच जाहिराती तुम्ही टीव्ही वर सुद्धा पहिल्या असतील. सोयाबीन पासून बायोडिझेल , पेंढ तयार केली जाते. आता आज सोयाबीनचे व्हेज कबाब सुद्धा बनणार आहेत बरं का !
सोयाबीन मध्ये ३८-४०% प्रमाणात प्रोटीन असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. शरीराचा घेर कमी करतात. २१% कार्बोहाइडेंट असतात जे उच्च रक्त दाब रोखण्यासाठी कारणीभूत आहे. लेसिथीन हे स्मरणशक्ती वाढवणारा घटक सोयाबीन मध्ये असतो . तसेच व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, लेक्टिन, फायबर इत्यादी पोषक घटक सोयाबीन मध्ये असतात. सोयाबीन मध्ये असणारे आयसोप्लेबोंस नामक रसायन शरीराचा ऑस्टीयोपोरोसीस या व्याधीपासून बचाव करण्यास सहायक आहे. लहान मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी तसेच नखांची व केसांची वाढ नीट होत नसल्यास आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. फिट्स येत असल्यासही सोयाबीनच्या सेवनाने गुण येऊ शकतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शांत निद्रा येण्यास सहायक आहे.
बापरे !!! किती सारे उपयुक्त गोष्टी आहेत या सोयाबीनच्या. तुम्हीही नक्की सोयाबीनचा उपयोग तुमच्या आहारात करा.
अरे देवा !. ३.३० वाजले वैभव येईल आता मला सोयाबीनचे व्हेज कबाब बनवायचे आहेत.
साहित्य : सोया चंक (सोयाबीनचे गोळे) , २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ), तेल इत्यादी .
कृती : प्रथम सोयाबीनचे गोळे (सोया चंक) गरम पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ते मऊ होतील. तोपर्यंत मिक्सर च्या भांड्या मध्ये २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर/कढीपत्ता हे सर्व बारीक करून पेस्ट बनवा. सोयाबीन मऊ झाले असतील तर पाण्यातून पिळून काढा. सोयाबीन पाण्यातून काढताना शक्य तेवढे पाणी पिळून काढा म्हणजे मिश्रण पातळ होणार नाही. आता पिळून काढलेले सोयाबीनचे गोळे मिक्सर मध्ये पेस्ट केली आहे त्यामध्येच घालून तसेच बारीक करा. म्हणजे कांदा लसूण आलं यांच्या सोबत सोयाबीन छान बारीक होईल. आता बारीक केलेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. त्या पेस्ट मध्ये लाल मिरची पावडर, चमचा जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ) तुमच्या अंदाजाने घाला. कारण सर्वांची पद्धत व चव वेगळी असते. ते मिश्रण हाताने छान हलवून घ्या. आता कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होईपर्यंत तुमच्याकडे कबाब बनवण्यासाठी रॉड असेल तर ठीक नसेल तर शिसपेन्सिल वर हि तुम्ही कबाब बनवू शकता . शिसपेन्सिल घ्या ती पाण्याने ओली करा . तुमचा हात पाण्यात बुडवून घ्या व पेस्ट चा गोळा करून पेन्सिलीभोवती उभ्या आकारात गोलाकार लावा मधून मधून पाण्याचा हात घेऊन आकार द्या नंतर अलगत पेन्सिल काढून घ्या . तयार झालेला कबाब मध्यम आचेवर तळून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पीस बनवा व तळून घ्या. हे कबाब तुम्ही टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता.
टीप : मिश्रण जर पातळ होत असेल तर मैदा किंवा कॉर्न फ्लोअर चे प्रमाण वाढवू शकता. तुमच्या कडे कॉर्नफ्लोअर नसेल तर बेसन पीठ वापरू शकता. कबाब शक्य तेवढा मंद किंवा मध्यम आचेवर भरपूर वेळ टाळून घ्या म्हणजे आतून तो नीट भाजेल.
रेसिपिसाठी फक्त अर्धा तास लागतो तुम्ही नक्की घरी बनवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
धन्यवाद !


No comments:
Post a Comment